प्रजूची मुंज झाल्यावर आम्ही हुन्नरगी ला देवाच्या दर्शनाला गेलो . हुन्नरगी माझाच काय पण आम्हा सर्व भावंडांच आवडतं गाव आहे . जगात त्याच्यापेक्षा सुंदर काही असूच शकत नाही यावर आम्हा सगळ्यांचा अगदी ठाम विश्वास आहे. गांधी हत्येनंतर जी दंगल उसळली त्यामध्ये गावातलं घर जाळलं . आजी -आजोबा हाताला लागेल ते सामान घेवुन , शेतावरच्या आमच्या घरात येवून राहिले. मग, परत कधी आम्ही गावात गेलोच नाही . शेतामधलं आमचं घरंच आम्ही रहाण्याचं ठिकाण बनलं , आणि आम्हा सर्वांच्या आवडीच पण झालं. घराच्या दोन्ही बाजूला चिंचेची झाडं , घरासमोरची विहीर , समोर पसरलेलं शेत , घरामागं असणारा पाणदीचा मातीचा रस्ता , तिथून घराकडं येणाऱ्या वाटेवर असणारा गुलमोहोर , विहिरीशेजारी असणारी जास्वंद, चिकू , बांबुच बन, पिंपळ , शेतातलं देवुळ , त्याच्याभोवतीने असणारी शमीची झाडं , औदुंबर , चंदन , सगळ सगळ अतिशय सुंदर आहे. चंदनाच्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची फळं खूप चविष्ट असतात . टणक कवचातली ती फळं सोलून खायला मजा येते , अगदी छोटीशी असतात . आता मात्र ती झाड नाहीत तिकडे . मला जे भावलं ते खूपच थोडं कॅमेर्या मध्ये पकडता आलं .